स्वप्नातलं मातीचं घर...

तसं पाहिलं तर आपल्या मनात अनेक इच्छा​,​ आकांक्षा​, स्वप्न ​ दडून ​राहिलेली असतात​...​ हे करावं​,​ ते बघावं​,​ इकडे जावं​, तिकडे तो देश, प्रांत बघावा...​ आपलं ​एखादं ​घर असावं​ ( हे ही आता अनेकांसाठी स्वप्नच होऊ लागलं आहे!),​ ​किंवा गावाकडे ​आपलं ​​एखादं घर असावं​,​ शेत ​असावं वगैरे वगैरे​...

या इच्छा प्रत्यक्षात आणणं कधी जमतं तर कधी नाही​.​ छोट्या छोट्या सहज जमतील अशा इच्छा त्यामानाने लवकर पूर्ण होतात​, किंवा ​ जिथे पैसे टाकून काही करायचं असेल ​( गाडी घेणे, युरोप ​बघणे किंवा हिमालयातला ​ट्रेक ​करणे ) अशा गोष्टी त्यामानाने सहज होऊ शकतात पण गावाकडे शेती आणि शेतामध्ये आपले घर असावे असं स्वप्न मात्र खरं ​होणं ( शहरातल्या जीवांसाठी )  जरा अवघड आहे​!!
( बऱ्याचदा त्यासाठी आपण काही खास efforts ही घेत नाही, स्वप्न पाहण्यातच धन्यता मानतो! )
नोकरी किंवा पैसे कमवण्याचं काय​?​ मुलांच्या शिक्षणाचं काय​? ​ घरच्यांचं काय​? EMI चं काय?!!​ या आणि अशा अनेक विवंचना आपल्याला मागे ओढत असतात आणि आपली स्वप्न फक्त स्वप्न राहून जातात​.
मग कधी ​ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर​, प्रदूषणाचा ​( ​मग ते हवेचं असो​, आवाजाचं असो​, की विचारांचं ​) त्रास झाल्यावर असं नक्कीच वाटतं की अरे यार कधी सोडणार आपण हे शहर? कधी आपल्या स्वप्नातल्या गावात, टुमदार घरात राहायला जाणार​?!! ​ आणि परत नवीन दिवस उजाडतो आणि आपलं स्वप्न आपण मनात बंद करून टाकतो​.​

मात्र आशुतोष आणि आर्या जोशी यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केलं आहे​! 
त्यांनी कोकणात राजापुर जवळ ताम्हाने  नावाच्या अतिशय छोट्या​शा ​ गावात एक जमीन घेऊन तिथे घर ​बांधलं आहे आणि घर नेहमीसारखं दिसत असलं तरी ते दगड ( त्याच भागात मिळणार चिरा ) आणि मुख्य करून त्या शेतातलीच माती वापरून बांधलेलं आहे​!​ ताम्हाने गाव इतकं छोटं आहे की तिथे केवळ एक ​घरगुती ​किराणा दुकान आहे. याउपर तुम्हाला काही घ्यायचं असेल, बाजाराला जायचं असेल  तर सात किलोमीटर जावं लागतं! अशा ठिकाणी असं वेगळं घर बांधायचं म्हणजे खूपच अवघड काम होतं पण आशुतोष​,​ आर्या आणि त्यांची आर्किटेक्ट अनुज्ञा यांनी ते करून दाखवलं आहे​.​ सुरुवातीला ​तिथले लोक म्हणत ​होते की असं मातीचा घर आता कोणी बांधत नाही​,​काहीजण बांधूया म्हणून आले पण निघून गेले​, आकाराम नावाचा एक अवलिया मात्र यांना म्हणाला की तुम्ही म्हणताय तसं घर कोणी बांधत नाही पण आपण बांधून बघूया मी तुम्हाला मदत करतो​!​ हा पेशाने गवंडी आहे पण त्याने पडेल ती सर्व काम केली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथही दिली​!​ इच्छा तिथे मार्ग असे आपण ​म्हणतो ​तसंच झालं गावातलं एक प्रस्थ प्रभुदेसाई बंधू यांचा खूप मोठा आधार आशुतोष आर्याला मिळाला... एक आपुलकीचं घरच मिळालं! आणि आज ​त्यांचं  हे स्वप्न सत्यात उतरलं आहे​.​ आशुतोष​,​आर्या​,​ त्यांची पाच वर्षांची मुलगी ​दीपान्विता हे तिघे जण त्या घरात राहू लागले आहेत​!!

आशुतोष हा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ​तर ​आर्या पीएचडी झालेली आहे​.​ दोघही मुंबई मध्ये वाढले आणि ​पुढे ​पुण्यामध्ये ​राहिलेले. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचे विचार पटल्यामुळे जीवनशैली मध्ये बदल घडवलाच पाहिजे असं ठरवून (35 वर्ष मोठ्या शहरांमध्ये ​राहून देखील ) आज ते या छोट्याशा गावात सेटल होऊ पहात आहेत​,​ एकेक येणाऱ्या अडचणी​,​ आव्हान सोडवत सोडवत, निसर्ग आणि त्याच्या गमती-जमती अनुभवत पुढे जात आहेत. चला त्यांचं हे घर पाहूया!

आवळा​,​ हिरडा​,​ बेहडा​,​ रीठा​, फणस​,​ भेरली माड​,​ सुरंगी अशा वेगवेगळ्या सुंदर झाडांच्या मध्ये लपलेलं आणि ​अनेक पक्षी, रान कोंबडे आणि ​​Malbar whistling thrush च्या गोड गाण्याची साथ असलेलं हे आशुतोष आर्याचं घर​!


आणि हा दर्शनी भाग​.​ समोर हातात कागद घेऊन पळत आहेत त्या ​दीपान्विता ताई​!​ बाबाला कुठलंतरी ​पेंटींग दाखवण्यासाठी पळत निघाल्या आहेत​!
घराच्या बांधकामात ​खाली ​दगड वापरला आहे आणि वर मातीच्या​,​ न भाजलेल्या​ पण उन्हात वाळवलेल्या ​वीटा वापरल्या आहेत​.​


संध्याकाळ होते​...​ पक्ष्यांचे आवाज हळूहळू बंद होत जातात​...​ ​रान कोंबडा 'जातो आता, संपला आजचा दिवस' सांगत असतो, रॉबिन retiring call देत शांत होतो  ​आणि घुबडांचे आवाज सुरु होतात​,​ रातवा कुठेतरी ​गात असतो...​ एक आल्हाददायक शांतात पसरते ( हातात आपोआप चहाचा/कॉफीचा कप येतो!) अशा वेळेस हे घर खासच ​दिसते!
या घरापर्यंत वीज कनेक्शन येण्यात अनेक अडचणी होत्या, त्या सोडवणं हा घर बांधण्या इतकाच मोठा कार्यक्रम झाला असता! अशा वेळी तुषार पोमण नावाचा मित्र मदतीला आला. एवढ्या रिमोट ठिकाणी सोलार चा सेटअप करणं मोठं काम होतं! त्याने त्या जागेचा अभ्यास करून, सोलार शिवाय दुसरी काही वीजच नाही आणि काही अडचण आली तर जवळपास काहीही मिळणार नाही  हे लक्षात घेऊन असा काही सेटअप करून दिला आहे की त्यावर पाण्याची मोटर आणि किचन मधला मिक्सर ही चालतो!
( इथे काही ' environmentalist ' जरा सुस्कारा सोडू शकतात, तर सोडू दे... तेवढंच deep breathing होईल! :-p ) तर आशुतोष, आर्याचा ' आम्ही किती भारी, आम्ही निसर्ग वाचवतो, आम्ही green, आम्ही अमुक-ढमुक' असा कुठला ही दावा नाही... एक साधी, सोपी, कमी स्ट्रेस असलेली, आणि होईल तितकी निसर्गाला धरून असणारी जीवनशैली ( हा ही शब्द अलीकडे फार जड झाला आहे!) जगून पाहण्याचा प्रयत्न आहे... यात कुठलाही अट्टाहास नाही, अभिनिवेश नाही. करतोय ते आपल्या आनंदा -सुखासाठी आहे, कोणाला काही दाखवून देण्यासाठी नाही! ( Disclaimer फारच मोठा झाला! :-p ) 

असो... तर रात्री घर असं छान दिसतं !


हा फोटो त्यांच्या लिविंग रूम मधून घेतलेला आहे. डावीकडे ​पाठमोरा ​बसलाय तो आकाराम​,​ मग आर्या​,​ आशुतोष आणि ​दीपान्विता. समोरच्या भिंतीमागे वर जाण्याचा जीना दिसतोय​.


हा तो​ ​वर जाण्याचा जीना​!
का कोण जाणे पण मला याच्यावरून जाताना ​दरवेळी खूप छान वाटत ​होतं! त्याच्या ​proportions मुळे असेल​,​ की ​लाकडाच्या पायाला होणाऱ्या स्पर्शामुळे​, की त्यावर पाय ठेवल्यावर लाकडी जिन्याचा येणारा  आवाज ऐकून मला पूर्वीचे जीने आठवून असेल माहीत नाही पण इथून दरवेळी जाताना मला खूप छान वाटलं​...


आणि ​वर आल्यावर ही अतिशय गोंडस जागा​!!
जिथे बसून आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो​... पुस्तक वाचू शकतो​,​ शांतपणे लिखाण करू शकतो​, ​शांत झोपू शकतो​!!​...​ अनेक गोष्टी इथे या जागी सुचू शकतात​! 
आपल्याला आपली शांत स्पेस मिळण्यासाठी, जो disconnect मला अत्यावश्यक वाटू लागला आहे तो मिळवण्यासाठी आणि आत डोकावण्यासाठी ही जागा परफेक्ट आहे!
दिवसा उजवीकडच्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग दिसत असतो आणि ​रात्री पाठ टेकल्यावर वरून चांदण्याचा प्रकाश डोकावत असतो​!!​

हे छतामधले खेळ करणं अवघड काम होतं. पण आर्कीटेक्ट अनुज्ञाने हे सगळं फार छान प्लॅन ही केलं आहे आणि जागेवर करवून ही घेतलं आहे. ऐन उन्हाळ्यात पंधरा-पंधरा दिवस साईट वर राहून काम करणारी, नुसते प्लॅन्सचं न देता प्रत्यक्ष मातीत हात घालणारी, कच्च्या छतावर चढणारी ही एक कमाल मुलगी आहे! जिथे जिथे अनुज्ञा काम करते तिथे दरवेळी 'नवा गडी नवं राज्य ' असतं !! म्हणजे काम करणारी लोकं नवीन असतात, त्यांना असं काही करायचं असतं हेच आधी मान्य नसतं, मान्य झालं तरी लक्षात येईलच असं नसतं! अशा वेळी अनुज्ञाला स्वतःला ते करून दाखवावं लागतं.... तिचं ( आणि आशुतोषचं 'कुशल मॅनेजर ' म्हणून ) कौतुक करायला मला वेगळा ब्लॉग लिहावा लागेल! :-)



​​इथे बसून तुम्हाला आवडेल ती गोष्ट करणे ​( ​मला काम करायला ही तितकंच आवडतं ​) ​हे सुख आहे​!​



हा रात्रीच्या वेळी घेतलेला ​घरातला फोटो​.​ कॅमेरा ठेवलाय ती लिविंग ​रुम,​ पलीकडे किचन आणि खाली बसून जेवण्याची जागा आणि उजवीकडे बेडरूम आणि टॉयलेट​.


हे प्रशस्त किचन, देवळी मध्ये बाप्पा  आणि जाळीचा दरवाजा दिसतोय ती स्टोर रूम. ही खोली अतिशय गार ​असते! उन्हाळ्यात या खोलीत झोपण्याचं बुकिंग मी आत्ताच करून ठेवलंय! :-)


आणि ही खास, शाही बेडरूम​!!


सर्वत्र अशा लाकडाच्या कड्या आणि हँडल्स बनवली आहेत.



अनुज्ञाने अनेक गोष्टींचे डिटेलिंग खूप छान केलेले आहे त्यापैकी हा एक फोटो​.​ मातीचा ​दिवाण/बैठक ​असूनही कंफटेबली उभे राहता येईल अशी योजना​ आवर्जून केलेली आहे.


या घराचं ​ventilation  अप्रतिम ​झालेलं आहे​.​ ही जी शेकोटी पेटलेली दिसते आहे; तिचा सगळा धूर आपसूक वर ​जाऊन बाहेर निघून जात होता​.​ जिथे बसून मी हा फोटो काढलाय इथे मला धुराचा केवळ हलकासा वास येत होता मात्र डोळे चुरचुरणे​,​ ​कोंदट वाटणे ​असं काही अजिबात होत नव्हतं​. आर्किटेक्टीन बाई जिंकल्या!! :-)


याच  जागेचा हा बांधकाम होत असतानाचा फोटो...


आणि हा दुसरा आता राहत्या घराचा फोटो.

या आहेत ​दीपान्विता ताई आणि त्यांची आई आर्या​.​ दीपान्विता ​ताई नशिबवान म्हणायच्या! ​ताईंचे चौथीपर्यंतचं शिक्षण हे घरीच
​( आई, बाबा, आणि निसर्गाकडून ) ​करावं असा आशुतोष आर्याचा विचार आणि प्रयत्न आहे. त्यांना हे clearly माहित आहे की हा एक अवघड प्रयोग आहे... सो हे करताना ती तिच्या वयाच्या मुलांपासून वेगळी पडू नये, किंवा तिच्या वयाच्या मुलांच्या ज्या सहज गरजा असतात, आयुष्याला वळण लावणाऱ्या गोष्टी असतात  (' उठ लवकर, शाळेची व्हॅन येईल ' सारख्या नाही!!) त्या सजगपणे ओळखून पुणे - ताम्हाणे असा मेळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इथेही त्यांचा approach हा सहज जमेल तेवढं करूया, अट्टाहास नको असाच आहे. 
" कुठेही निघालेलो नाही, कुठेही पोहोचण्याची घाई नाही, मला कोणाला काही prove  करून दाखवायचे नाहीये, कोणाला सुधारायचे तर अजिबात नाही! वाटेत जे मिळेल त्याचा आनंद घेत- देत मी चालत राहणार " या माझ्या philosophy चं प्रत्यक्ष उदाहरण मला इथे बघायला मिळालं!


 इथे राहून आर्या मराठी विकिपीडियासाठी​,​ ज्ञानप्रबोधिनीसाठी​,​ तसेच इतरही लिखाण करते​.​ मोबाईल आणि लॅपटॉप​वरून online पद्धतीने तिचं ​काम चालतं​.​ सोबतीला अनेक प्रश्न विचारायला ताई असतातच​!!


​​दीपान्विता  ताईंचा दिवस शहरातल्या ​मुलांपेक्षा खास वेगळा आणि भरभरून देणारा असतो. कधी बाबा बरोबर खेळ खेळा​...​ कधी हर्मोनियम वाजवा​...​ कधी आई बरोबर काहीतरी शिका​...​ ग्रीटिंग करा​,​ पेंटिंग करा​! आर्या आशुतोष तिला अनेक चर्चांमध्ये सामिल करून घेतात, तिला गोष्टी समजावून सांगून तिचं मत घेतात.


​पण तिचा जास्त वेळ हा बाबाचं शेपूट ​बनून त्याच्या मागेमागे फिरण्यातच जातो​! बाबा बाहेर काही घ्यायला निघाला कि ताई चिकटल्याच समजा​!! इथे 'हात धरून चाल, असंच कर, तसं करू नकोस' असं काही सांगावं लागत नाही... बाबा पुढे चालतो आहे आणि तोंडाची टकळी चालू ठेऊन ताई मागे मागे! :-)


 थोडं चालायचं आणि मग उचलून घे म्हणायचं​!​ असं बाबाच्या कडेवर बसून ​निसर्ग न्याहाळत ​फिरण्याचं सुख ​खासच!!
आपल्या एकूण आयुष्यात हे सुख फार कमी काळ मिळतं...



इथे  दीपान्विता  आणि आई यांच्या मध्ये काही प्रेमसंवाद चालू आहेत​!​ दीपान्विता  ताईंकडून आईचीच उलटतपासणी घेतली जात आहे की ​"​पण मग तू तर असं म्हणाली होतीस वगैरे वगैरे​..." :-)​



आशुतोष आणि आर्या




बांधकाम चालू असताना; डावीकडे आशुतोष आणि पाठमोरी उभी आहे ती अनुज्ञा. अनुज्ञाने अधून मधून सलग काही दिवस तिथे राहून काम केलं​. माती मळणे, वीटा बनवणे, आपल्याला काय हवंय ते लोकांना समजावणे ( फार मोठं काम!)​ अशी सर्व कामं केली. आशुतोष भाऊंनी मात्र तिथेच मुक्काम ठोकला होता! त्याशिवाय एवढं काम होऊ​च शकत नाही​!!​ या फोटोत डावीकडे मातीचा कॉलम छान दिसत आहे​.​


​​हीच ती पहिल्या मजल्यावरची  खास जागा​ ( बांधकाम चालू असताना) ​



आणि आता पूर्ण झाल्यावर ती जागा अशी दिसते​!​ ही जागा या घरातली एक अतिशय खास जागा आहे​!​! गाभारा म्हणायचं का याला?!! म्हणजे देऊळ बाहेरून ही छान असतं आणि आतून ही... पण गाभाऱ्याचा फील काही वेगळाच असतो! तो तिथे गेल्यावरच जाणवतो!



या फोटोत डावीकडे आकाराम​,​ वर मागे बसलेली अनुज्ञा​,​ आर्या​,​​  दीपान्विता आणि सगळ्यात खाली उजवीकडे आशुतोष​.


आणि बांधकामाच्या फ्रंटवर लढणारे हे तीन वीर​!! या फोटोत तिघे खूप स्वच्छ दिसत असले तरी ते असे फारच क्वचित दिसायचे​/राहू शकायचे! :-)​ आशुतोषची चप्पल तिथेच एका चांभाराकडून बनवून घेतलेली आहे.

तर या एका वेगळ्या प्रयत्नाला माझ्या खूप खूप शुभेच्छा!!

Popular posts from this blog

कधीच घडू नये अशी एक गोष्ट!

Online@tasgav.com