कधीच घडू नये अशी एक गोष्ट!

 

Photo by Ilya Perelude: https://www.pexels.com

( २०५० सालचा एक दिवस )


ऋषी असा का वागतोय काही समजतच नाहीये

गेला आठवडाभर पहाते आहे मी, काही तरी खूप बिनसलंय... 

मी बोलायचा प्रयत्न करते आहे आणि तो सारखा टाळतो आहे, चिडचिड करतो आहे.

आज मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन खोलीत गेले तर खेकसलाच माझ्यावर! काय सारखी डिस्टर्ब करतेस आई, बाहेर जा!!

धक्काच बसला मला!

मानसी नवऱ्याला सांगत होती.


रात्री गादीत पडल्यावर दोघांचे मोबाईल बाजूला जाऊन बोलायला मिळेल अशी संधी अलीकडे फार कमीवेळा मिळायची.


नवीन जॉब आहे गं... काही तरी टेन्शन असेल ऑफिसमध्ये... त्याला सेटल व्हायला वेळ द्यायला हवा.


समीरने मानसीची समजूत काढायचा प्रयत्न केला... पण त्यालाही जाणवत होतं की आपला मुलगा कुठल्यातरी जबरदस्त स्ट्रेस मध्ये आहे.

ऋषी हुशार आणि अगदी बॅलन्सड मुलगा... एवढ्या परीक्षा दिल्या, शाळेत कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्या... असा स्ट्रेसमध्ये कधीच दिसला नव्हता...


मनू तू काळजी करू नकोस, मी बोलतो त्याच्याशी... आणि फार काही नसणार गं... तरुण आहे, होते कधी तरी चिडचिड... तुझ्यावर ओरडला याचं त्यालाही वाईट वाटलंच असणार आहे.

===================================================================================


अरे!? आश्चर्यऋषीची मोठ्ठी मेल आली आहे बघ!


हो की चायला!! या मुलाला मेल का पाठवावी वाटली?!! प्रत्यक्ष बोल की म्हणाव घडाघडा!! हे म्हणत समीरने एक खोल श्वास घेतला.

वाच बरं मोठ्याने...


प्रिय आई, बाबा, आजी आणि आबा...

एवढं वाचूनच मानसीचे डोळे डबडबले... 

समीर.......... तूच वाच!


एक मोठा श्वास घेऊन समीर वाचू लागला...

प्रिय आई, बाबा, आजी आणि आबा,

मला जे सांगायचं आहे ते तुम्ही जरा धीराने घ्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे.

प्रत्यक्ष बोलायचा प्रयत्न केला पण जमलं नाही म्हणून ही ईमेल.

मला माहित आहे की तुमच्या लक्षात आलंय की मला काही तरी स्ट्रेस आहे...

आमच्या ऑफिसमध्ये गेल्या आठवड्यात रुटीन म्हणून आम्हा नवीन जॉईन झालेल्या वीस एम्प्लॉईजच्या वेगवेगळ्या टेस्ट्स करण्यात आल्या...

आम्ही सगळेच कुठल्या कुठल्या ऍलर्जीचे बळी आहोतच... त्यात काही नवीन नाही.

पण वीस पैकी आम्हा चौदा लोकांच्या पोटात छोट्या मोठ्या गाठी आढळल्या आहेत.

पुढे त्या गाठींचे इन्वेस्टीगेशन केल्यावर लक्षात आले की आम्हा नऊ लोकांना पहिल्या स्टेजचा कॅन्सर आहे! होय आम्हा नऊ लोकांना!! मला ही......

समीरचे हात थरथरायला लागले, आवाज कापरा झाला... मानसी तर डोळे मिटून रडायलाच लागली!

समीरने तिची खुर्ची जवळ ओढली आणि तिच्या हातावर हात ठेऊन म्हणाला ' मनू...... थांब... शांत हो....' पुढे वाचायचा धीर त्याला ही नव्हताच!

खरं तर आता कॅन्सर हा घरोघरी होता... समीर आणि मानसी देखील पोटातल्या गाठी, इकडची गाठ तिकडची सूज दर सहा महिन्यांनी चेक करतच होते!

पण आपल्या त्या गोड पिल्लाला असं काही होणं accept करणं फार अवघड जात होतं.

समीरने डोळे पुसले, एक मोठा श्वास घेतला आणि तो वाचू लागला.

माझ्या सर्वोच्च लाडक्या आई, बाबा, आजी आणि आबा सावरा स्वतःला... मी ही तेच करतो आहे!

आई... मी ओरडलो त्या दिवशी तुझ्यावर... कॅन्सरचा रिपोर्ट वाचल्यावर वाईट वाटलं त्यापेक्षा कित्त्येक पटींनी वाईट वाटलं होतं मला! चुकलो मी... आई सॉरी... मनापासून सॉरी...

मानसीचा बांध सुटला.


दोघेही जरा शांत झाल्यावर समीर पुढे वाचू लागला.

तुम्हाला खरं सांगू? मला या कॅन्सरचं काही कौतुक नाही. मी तिसरीत असताना रिद्धीला कॅन्सर झाला तेंव्हा मला पहिल्यांदा समजलं होतं की हा काही तरी भयानक रोग असतो, तो झाल्यावर खूप दिवस शाळेत येता येत नाही, मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही;  पण आता आम्हाला त्याची सवय झाली आहे.

कोणाला कॅन्सर झाल्याची बातमी ऐकल्यावर तुमच्या चेहेऱ्यावर दिसणारी भीती; एवढीच भीती मला त्याची आहे.

त्याला सामोरं जाणं आता आमच्या पिढीला अंगवळणी पडलं आहे. त्यामुळे आपण कॅन्सरविषयी नको बोलायला.

मला जे सांगायचं आहे त्याचा निर्णय होत नव्हता म्हणून मी स्ट्रेस मध्ये होतो.

आता पटकन सांगून टाकतो आणि मोकळा होतो!


आई, बाबा, आजी आणि आबा, मी ठरवलंय... मी लग्न करणार नाही... मला माहित आहे तुम्हाला नातवंड हवीत, त्यांची स्वप्नं तुम्ही रंगवत असता. 'ऋषीचं लग्न झाल्यावर आम्ही दोघे रिटायर होणार आणि नातवंडांची वाट पहाणार' असं तुम्ही हसून सगळ्यांना सांगत असता.

पण मी मुलं होऊ देणार नाही. त्यासाठीच लग्न करणार नाही.

मला माझ्या मुलांना शाळेत जाताना ' सिलिंडर मध्ये ऑक्सिजन फुल आहे ना? ग्लोव्हज घातले आहेत ना? मास्क काढून खेळायला जाऊ नकोस हां! ' असं सांगायचं नाहीये!

माझ्या मुलांनी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाला गेल्यावर ' मला हे चालत नाही, ते चालत नाही ' असं म्हणून घरून नेहलेला डबा खाऊन गप गुमान ऑक्सिजन मास्क लावून घरी यावं हे नकोय!

आबा सांगतात की ते नदीत पोहायला जायचे! तुम्ही सांगता की तुम्ही मास्क लावता सगळीकडे हुंदडायचा... तुम्ही कोणाच्याही घरी गेलात की तिथलं पाणी, त्यांनी केलेला खाऊ, रस्त्या कडेला मिळणारी बोरं, पेरू खायचा... चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडून खायचा! एकमेकांच्या डब्यातलं खायचा! एकाच बाटलीतलं पाणी सगळे प्यायचा! पूर्ण अंग झाकता बिनधास्त कुठेही आणि कितीही वेळ फिरायचा

'मला नाही आवडत ती भाजी' म्हणून तुम्ही भाजी खाणं टाळायचा; ऍलर्जी आहे म्हणून नाही!

आई-बाबा..... ते सुख देऊ शकाल मला??!

आत्तापर्यंत तुम्ही मला सगळ्या महाग महाग गिफ्टस्  दिल्या... बेस्ट शाळा, बेस्ट कॉलेज, बेस्ट हॉटेल्स, बेस्ट बाईक, बेस्ट एरिया मधला डुप्लेक्स फ्लॅट...लिस्ट मोठी आहे.

पण मला त्या सगळ्याचा उबग आलाय... हॉरिबल दिखाऊ आहेत ही सुखं!!

मला मास्क काढून रस्त्याने इकडे तिकडे बघत, आरामात चालायचं सुख देऊ शकता का?!!

आबा सांगतात ते पूर्वी रस्त्यांनी चालत फिरायचे तेंव्हा कुठून तरी उदबत्तीचा सुगंध यायचा... कोणाच्या तरी बंगल्या बाहेरच्या फुललेल्या कुंतीचा सुगंध वेड लावायचा... कोणाच्या तरी घरातून फक्कड फोडणीचा वास यायचा!!

मला ती सुखं हवी आहेत!!!

मला मित्रांसोबत मास्क लावता क्रिकेट खेळायचे आहे, भरपूर हुंदडायचे आहे, थिएटर ला जाऊन मूवी बघायचाय, गाड्यावरचा वडा पाव खायचाय!

मी सगळ्या दुखण्यांवर मात करेन, जगातल्या बेस्ट कंपनी मध्ये नोकरी करून तुम्हाला लाखो डॉलर मिळवून देईन, तुमच्या सगळ्या मित्रांत, नातेवाईकांत तुमची कॉलर ताठ होईल असं सगळं देईन!! तुम्ही मला जे हवं ते देऊ शकता का?!

प्लीज.... तो गेलेला काळ परत आणू शकता का??


नाही देऊ शकत, मला माहित आहे.


पण मला माझ्या मुलांना असं भयानक जगणं द्यायचं नाहीये.

ऑक्सिजन मास्क शिवाय बाहेर जायचं नाही, मॉलिक्युलर फिल्टर शिवाय पाणी प्यायचं नाही, फळांत विषारी केमिकल्स, धान्यात विषारी केमिकल्स, भाज्यांमध्ये, आमच्या रक्तात, आईच्या दुधात ही विषारी केमिकल्स!!!

तुम्ही लोकांनी आमच्यासाठी हवा, पाणी, जमीन काही म्हणजे काहीच विषारी केमिकल्सशिवाय सोडलं नाहीत की हो!!!

माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना ऍलर्जीज्  तर जन्मतःच आहेत, कोणाची नजर अधू, कोणाचे हातपाय वाकडे, कोणाला केसच नाहीत, कोणाचा शी-शू वर कंट्रोल नाही, कोणी गतिमंद, कोणी मतिमंद... काय दिलंत तुम्ही आम्हाला हे?!!

काय करू आम्ही तुमच्या या पैशांचं, सोन्या-नाण्यांचं, प्रॉपर्टीजचं?!! आरोग्य का नाही दिलंत तुम्ही आम्हाला?!!

आबा तुम्ही ज्या नदीत मनमोकळे पोहोत होता, त्यात साबणाचं, ड्रेनेजचं पाणी सोडायचं नाही हे कसं लक्षात आलं नाही तुमच्या?!

आबा, आजी तुमच्या पिढीने साबण, शांपू, फेस वॉश, माऊथ वॉश रोज वापरले म्हणे! खरंच रोज वापरायचा तुम्ही ते?! का??? एकदाही पुढच्या पिढ्यांचा विचार नाही आला तुमच्या मनात?!

रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं तुमच्या आणि तुमच्या आधीच्या पिढीने भयानक वापरली. तुम्हाला सरकारकडून सबसिडी मिळत होती म्हणे!! तिची किंमत आम्ही मोजतोय!

आई-बाबा लहानपणापासून तुम्ही सांगत आलात ' जी गोष्ट आपल्याला मिळेल ती सगळ्यांशी शेअर करून वापरायची'. होय ना?!

मग आमचा स्वच्छ हवेचा, पाण्याचा, जमिनीचा शेअर कुठे आहे?!! द्या ना आमच्या पिढीला आमचा शेअर!


माफ करा... मी जरा जास्तच उद्विग्न झालो आणि बोललो तुम्हाला... तुमच्याकडून हे नकळत झालं हे माहित आहे पण थोडे सजग राहिला असता पुढच्या पिढ्यांविषयी तर...

तर कदाचित् तुम्हाला नातवंडांचं सुख देऊ शकलो असतो मी...

माफ करा... आणि काळजी घ्या...

प्रेम प्रचंड आहेच आणि राहीलच...


तुमचा,

ऋषी

==================================================================================


ही गोष्ट काल्पनिक आहेमात्र ती वाटते तेवढी ही काल्पनिक नाही

http://indiaenvironmentportal.org.in/files/Punjab_blood_report.pdf  ही लिंक पाहिल्यास एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजे २००४ मध्ये झालेला अभ्यास वाचल्यास तुम्हाला लक्षात येईल की तेंव्हाच माणसांच्या रक्तामध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले होते. आज तर परिस्थिती अजून वाईट असणार! मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. परिस्थिती सुधारावी यासाठी आपण खालील गोष्टी नक्की करूया. रोजच्या धकाधकीत सगळ्यांना नाही जमणार, मान्य आहे, पण ज्यांना जमेल आणि जेवढं जमेल तेवढं नक्की करूया. 


) रोज साबण वापरणं टाळूया. शक्य असल्यास १० दिवसातून एकदाच वापरूया. कारण ते केमिकल वाहून नदीत जाते, तिथून शेतात, तिथून पिकात आणि तिथून परत आपल्या पोटात, विष बनून! पुणे शहराची लोकसंख्या ४० लाख धरली आणि प्रत्येक माणूस रोज (कमीत कमी)  ग्रॅम साबण ( अंगाचा, केसांचा, दातांचादाढीचा, कपड्याचा, भांड्याचा, फरशीचा, टॉयलेट धुण्याचा) वापरतो म्हणलं तर रोज आपण किमान सोळा हजार किलो साबण नदीत, जमिनीत, शेतात पाठवत आहोत! कारखाने, हॉस्पिटल्स, गॅरेजेस, एक्सपायर झाली म्हणून फेकून दिलेली औषधे यांविषयी तर बोलायलाच नको! हा लेख वाचून अनेक लोकांचे मेसेजेस आले, त्यावरून समजले की बरेच लोक साबण खूप कमी वापरतात; अंघोळीला तर वापरतच नाहीत! त्यांत अनेक डॉक्टर्स आहेत. अनेकजण वॉशिंग मशीनमध्येही रिठ्याचं पाणी वापरतात; गेली अनेक वर्ष!


२) जिथे जिथे आपण कुठलेही केमिकल वापरतो, तिथे दोनदा विचार करूया की खरंच याची गरज आहे का? न वापरल्याने काही मोठे नुकसान होणार आहे का?

 

) ऑरगॅनिक वगैरे लेबलं असणारी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स देखील वापरणे टाळूया. कारण कळत ते ही; कमी प्रमाणात का असेना पण तेच करतात. उटणं, रिठा, शिकेकाई वापरूया. पण ते ही फार नको कारण मग ती झाडं ओरबाडली जातील! अति सदा वर्जयेत!


) शेतात रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं वापरणं कमीत कमी करत बंदच करूया. कारण त्या केमिकल पैकी ७०-८०% केमिकल हवेत, जमिनीत, पाण्यात आणि पिकणाऱ्या अन्नात जाते, पुढे सांगायलाच नको!


) आपण विषमुक्त अन्न मिळवायचा प्रयत्न करूया. त्यासाठी जे शेती करत आहेत त्यांना विषमुक्त अन्न पिकवायला सांगून, 'आम्ही ते जास्त मोबदला देऊन नक्की विकत घेऊ' ही खात्री देऊया.

 

) आणि सगळ्यात महत्वाचं! आपल्या गरजा आणि उपभोग थोड्या-थोड्या कमी करूया ना! आपल्याच नातवंडां-पतवंडांसाठी. त्यांचा निर्विष हवा, पाणी, जमिनीचा शेअर  त्यांना मिळावा म्हणून, त्यांना आपल्या सारखंच मोकळं आयुष्य जगता यावं म्हणून!


Popular posts from this blog

स्वप्नातलं मातीचं घर...

Online@tasgav.com